शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची तात्काळ मदत द्या-राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तालुका भोकर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी भोकर येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात काढण्यात आला मोर्चा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला,परंतू शेतकऱ्यांना देण्यात येत असलेली ५ हजाराची मदत निधी ही तुटपुंजी असल्याने ती न देता एकरी ५० हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस भोकर तालुका आणि शहर कमिटीच्या वतीने राज्य सरकार विरोधात दि.२८ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावर्षीचा खरीप हंगाम पावसा अभावी वाया गेला व यामुळे शेतकरी पार मेटाकुटीला आला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.हे पाहता राज्य सरकारने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. परंतू शेतकऱ्यांना देण्यात येणारी ५ हजाराची मदत निधी ही अतिशय तुटपुंजी आहे.नव्हे तर सरकारने शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टा केली आहे.ही बाब अतिशय निंदनीय असल्याने सरकारने शेतकऱ्यांना प्रतिएकरी ५० हजार रुपयांचा मदत निधी तात्काळ द्यावा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा,प्रलंबित पीकविमा तात्काळ देण्यात यावा, दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात चारा छावण्या सुरू करून जनावरांसाठी चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी,तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे किंवा अन्य पर्यायी माध्यमांतून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा.यांसह विविध मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहर राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.२८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी निषेध मोर्चा काढण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा पुतळा जाळण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला व मुख्य रस्त्याने तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला आणि तेथे या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत करण्यात आले.या सभेत तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील यांनी प्रास्ताविकातून सदरील मोर्चीची पार्श्वभूमी व्यक्त केली.यावेळी ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे,काँग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे,महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई चव्हाण,काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाडे, भोकर विधानसभचे नेते तिरुपती पाटील कोंडेकर व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी भ्रमणध्वनी वरुन मोर्चास संबोधित केले.तर या सभेचे सुत्रसंचालन एल.ए.हिरे यांनी व आभार प्रदर्शन माधव शिंदे यांनी केले व उपरोक्त मागण्यांचे निवेदन तहसिलदार भोकर यांना देण्यात येऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.






