आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडासामाजिक

गणराज सादुलवार यांच्या पुढाकारातून पोमनाळा येथील भवानी मंदिरात ५१ जोडप्यांनी केली सामूहिक महापूजा

सलग दुसऱ्या वर्षी ही ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वेशभूषेत काढण्यात आलेल्या शोभायात्रेसह भक्तीमय वातावरणात केली महापुजा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : दसऱ्यानिमित्त सिमोल्लंघनानंतर हजारो नागरिक नतमस्तक होतात असे जाज्वल्य देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पोमनाळा ता.भोकर येथील भवानी मातेच्या मंदिरात प्रसिद्ध उद्योजक गणराज उर्फ गंगाधर सादुलवार यांच्या पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वेशभूषेत काढण्यात आलेल्या मिरवणूकीसह भक्तीमय वातावरणात ५१ जोडप्यांनी केली सामुहिक महापुजा.
दसऱ्यानिमित्त सिमोल्लंघनानंतर पोमनाळा ता.भोकर येथील जाज्वल्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भवानी मातेचे दर्शन हजारो नागरिक घेतात व दसरा सण साजरा करतात.या दिवशी तेथे यात्रेचे स्वरुप येते.ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.या परंपरेत भोकर येथील उद्योजक गणराज उर्फ गंगाधर सादुलवार यांनी आगळी वेगळी भर घातली आहे.ती म्हणजे जोडप्यांच्या सामुहिक महापुजेची. सामुहिक महापुजेचे हे दुसरे वर्ष असून त्यांच्या पुढाकारातू यावर्षी देखील महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. दसरा हा विजय,मांगल्य,शक्ती आणि नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो.याच पवित्र सणाचे औचित्य साधून पोमनाळा येथील भवानी मातेच्या चरणी सामूहिक पूजनाचा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी पोमनाळा गावातील मुख्य रस्ते व घरा समोर सुंदर अशा रांगोळी काढण्यात आल्या होत्या. रांगोळ्यांनी सजलेल्या या रस्त्यावरुन काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून, डोक्यावर आकर्षक फेटे बांधून मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला होता.ढोल-ताशांच्या गजराने व तुतारी वाद्यांच्या निनादाने या शोभायात्रेस राजेशाही स्वरूप प्राप्त झाले होते.या प्रकारे पारंपरिक वाद्यांच्या सुरावटीत निघालेल्या शोभायात्रेतून भवानी देवीमातेचा जयघोष करण्यात आला.’जय भवानी,जय अंबे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शोभायात्रेतील पारंपरिक थाट,भक्तांचा उत्साह आणि महिलांचा लक्षणीय सहभाग हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले होते.
निघालेल्या शोभा यात्रेची सांगता भवानी माता मंदिरात करण्यात आली व वैजनाथ स्वामी आणि गजेंद्र स्वामी यांनी वदलेल्या मंत्रोचाराच्या गजरात ५१ जोडप्यांनी सामुहिक महापुजा,आरती केली.सदरील ५१ जोडप्यांत  भोकरचे नगराध्यक्ष भगवान दंडवे,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,गणराज सादुलवार,पत्रकार बीआर.पांचाळ, संतोष उत्तरवार,विनय दुर्केवार,शिव पाटील,यांसह आदी मान्यवरांची सपत्नीक सहभाग घेतला होता.यावेळी गावातील नागरिक,महिला भगिनी,पंचक्रोशीतील व्यापारी व प्रतिष्ठित मंडळी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.उद्योजक गणराज सादुलवार यांनी या पूजेचे सुंदर व शिस्तबद्ध नियोजन केले होते.त्यामुळे सादुलवार परिवार व सहभागी मान्यवरांचा पोमनाळा येथील ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच उद्योजक शिव पाटील व गावकरी मंडळीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसादाचा आस्वाद सर्व भाविक भक्तांनी घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close