धानोरा ता.भोकर येथे ‘पुर पश्चात आरोग्य शिबिर’ संपन्न
संभाव्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर घेण्यात आले हे शिबिर

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील काही गांवात पुराचे पाणी शिरले होते व त्यामुळे त्या गावातील नागरिकांना आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर घेण्यात यावित असे प्रशासनाने सुचविले होते.त्याच अनुषंगाने भोकर तालुक्यातील मौ.धानोरा या पुरग्रस्त गावात आरोग्य विभागाच्या वतीने दि.३ ऑक्टोबर रोजी ‘पुर पश्चात आरोग्य शिबिर’ घेण्यात आले.
नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले,नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सुचविल्या नुसार नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश जाधव यांनी भोकर तालुक्यातील पुरग्रस्त गावांत ‘पुर पश्चात आरोग्य शिबिर’ घेण्यास सुरुवात केली असून दि.३ ऑक्टोबर २०२५ रोजी मौ.धानोरा ता.भोकर या पुरग्रस्त गावात हे शिबिर घेण्यात आले आहे. 
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन धानोराच्या सरपंच सौ.वंदना राजेश्वर करपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.तर हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वागदकर,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.उमेश जाधव,डॉ.राजपूत,भोकर तालुका आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) मोहन पाटील पेंढारे,आरोग्य सेविका वाघमारे,आरोग्य सेविका पाईकराव,आरोग्य सेवक राजरवाड दादा,धानोरा येथील अंगणवाडी सेविका भाडमुखे,पोतरे व मदतनीस,आशाताई भडंगे,समाज सेवक नागसेन कावळे व अतुल कानवटे यांसह आदिंनी परिश्रम घेतले. 
या आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या मध्ये उच्च रक्तदाब,मधुमेह तपासणी ५७,स्त्री कर्करोग तपासणी ३३,गर्भाशय कर्करोग तपासणी ११,नेत्र रोग तपासणी ६१,हिमोग्लोबिन ६३ तपासणी, संशयीत क्षय रोग तपासणी ३२,कुष्ठरोग तपासणी ७,मुख कर्करोग तपासणी ५७,गरोदर माता तपासणी ४,सॅम/मॅम बालके तपासणी ४,सिकलसेल तपासणी ३०,सिबीसी तपासणी ३०,थायरॉईड तपासणी १,यांसह आदी तपासण्यांचा यात समावेश आहे.तसेच राष्ट्रीय किटक जन्य रोग कार्यक्रमांतर्गत डेंग्यू,मलेरिया, हत्तीरोग या आजाराबाबत ही यावेळी माहिती देण्यात आली. आठवड्यातून एक दिवस घरातील पाणी साठे घासून,पुसून कोरडे करायचे व कोरडा दिवस पाळायचा, साथ रोगाबाबत आरोग्य शिक्षण दिले व किटक शास्त्रीय सर्वेक्षण ही यावेळी करण्यात आले.




