भोकर नगर परिषदेंतर्गत गेल्या २० वर्षात जेवढी कामे झालीत,त्या दुप्पटीने या ५ वर्षात करु-खा.अशोक चव्हाण
भोकर येथील उद्योजक व्यंकटेश आसावा यांनी आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह भेट कार्यक्रमात खा. अशोक चव्हाण यांनी दिली शास्वती

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहराच्या विकासासाठी मी कधीच निधीची कमतरता भासू दिली नाही.शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव झुकते माप दिलो आहे. त्यामुळे विविध प्रकारे विकास कामे होऊ शकली आहेत.नगर परिषदेची निवडणूक लवकरच आहे. आगामी निवडणूकीत आपले उमेदवार निवडून आणून एक हाती सत्ता द्या,नगर परिषदेंतर्गत गेल्या २० वर्षात जेवढी कामे झालीत,त्याच्या दुप्पटीने या ५ वर्षात विकास कामे आपण करु,अशी शास्वती माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी भोकर येथील उद्योजक व्यंकटेश आसावा यांनी आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह भेट कार्यक्रमात दिली.
दिवाळी निमित्त माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार ॲड.श्रीजया चव्हाण,माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांसह आदी मान्यवरांनी भोकर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या घरी व आयोजित स्नेह भेट कार्यक्रमास उपस्थिती लावली.भेटी दिलेल्या इच्छुक उमेदवारांत नगराध्यक्ष पदाचे दावेदार भगवान दंडवे,प्रभाग क्र.२ चे इच्छुक उमेदवार विठ्ठल पाटील धोंडगे,बाजार समितीचे संचालक सारंग मुंदडा, प्रभाग क्र.३ चे इच्छुक उमेदवार अमोल शहागंठवार, उद्योजक व्यंकटेश आसावा व कापड व्यापारी गिरीधारी झंवर यांचा समावेश आहे.यापैकीच इच्छुक उद्योजक व्यंकटेश आसावा यांनी दि.२४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी आसावा जिनिंग परिसरात दिवाळी स्नेह भेट सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार ॲड.श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच सोहळा पीठावर सभापती जगदीश पाटील भोसीकर,उपसभापती बालाजी शानमवाड,संचालक किशोर पाटील लगळूदकर,रामचंद्र मुसळे,गणेश पाटील कापसे, दिलीपराव देशमुख सोमठाणकर,नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार शासकीय कंत्राटदार चंद्रकांत पाटील (खन्ना) चिंचाळकर,भाजपा तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी सुरकूठंवार, शहराध्यक्ष विशाल माने,अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,माजी शहराध्यक्ष शिवा जाधव यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत व्यंकटेश आसावा यांनी सपत्नीक केले.
तसेच सदरील सोहळ्याचे प्रास्ताविकपर मनोगत आयोजक उद्योजक व्यंकटेश आसावा यांनी केले.यावेळी बोलतांना खा.अशोक चव्हाण पुढे म्हणाले की,सण,उत्सवाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे.नव्हे तर मला यातून तुम्हा सर्वांचे मनोमिलन झाल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वांनी असेच एकत्रित राहून एकजुटीने काम करावे व नगर परिषद आपल्या हाती घ्यावी.मी तुमच्या सोबत आहे, निधीची चिंता करु नका.भोकरला सुंदर शहर करू,तसेच सर्वांना सुख, समाधान,आनंद व यश मिळावे.असे म्हणत त्यांनी दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.ढोल ताशा व भव्य आतिशबाजीने व्यंकटेश आसावा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तसेच सोहळ्याच्या सांगतेनंतर स्वादिष्ट व रुचकर असा फराळ दिला.या सुनियोजनबद्ध सोहळ्याचे उत्कृष्ट असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक मनोज गिमेकर यांनी केले.




