आपलं नांदेडआरोग्यधार्मिकनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराज्यसामाजिक

मानवसेवा-हिच ईश्वर सेवा…जीवनदान देणाऱ्या रुग्णवाहिकेचा भोकर मध्ये झाला भव्य शुभारंभ

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या या रुग्णवाहिका सेवेचे नगराध्यक्ष भगवानराव दंडवे व तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : रस्ते अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळून देत त्यांना जीवनदान देण्याच्या उदात्त हेतूने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान,नाणीज यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गांवर सुरू असलेल्या विनामुल्य सेवेतील ५४ रुग्णवाहिकेपैकी १ रुग्णवाहिका संस्थांनच्या वतीने भोकर तालुक्यासाठी उपलब्ध झाली असून तिचा भव्य शुभारंभ बुधवार,दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसिल कार्यालयासमोर नगराध्यक्ष भगवानराव दंडवे व तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.यावेळी नगरसेवक,प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव व तालुका सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ही रुग्णवाहिका भोकर तालुक्यासाठी उपलब्ध व्हावी म्हणून सांप्रदाय समितीचे तालुकाध्यक्ष गंगाधर पडवळे व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थांच्या वरीष्ठांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले व १ रुग्णवाहिका संस्थांनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.या रुग्णवाहिकेच्या विनामुल्य सेवेचा लाभ अपघातग्रस्तांसाठी एक आशेचा किरण ठरणार असून संकटकाळात तातडीची वैद्यकीय मदत पोहोचवून अनेकांना नवजीवन मिळणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेचा हा शुभारंभ सोहळा समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात मानला जात आहे.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थानचे कार्य समाजासाठी अत्यंत अनमोल व प्रेरणादायी असल्याचे सांगितले व संस्थेच्या उपक्रमांमुळे हजारो गरजू नागरिकांना मदत मिळत असून अशा समाजोपयोगी कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे,असे ही ते म्हणाले.तर नगरसेवक राजेश्वर देशमुख यांनी रस्ते अपघातांमध्ये वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो,अशा परिस्थितीत संस्थेच्या या रुग्णवाहिकेची विनामुल्य सेवा ही अत्यंत उल्लेखनीय व पुण्यदायी असल्याचे सांगत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.तसेच तहसिलदार विनोद गुंडमवार हे म्हणाले की, महाराष्ट्रात तळागाळातील जनतेसाठी सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविणारी अग्रगण्य संस्था म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या या सेवाभावी संस्थानचा उल्लेख केला जातो.त्याचा अभिमान शासन व प्रशासनासही असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.तर
संपादक उत्तम बाबळे हे म्हणाले की,संस्थेच्या विनामुल्य रुग्णवाहिका सेवेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली असून संस्था व सांप्रदाय सेवा समितीमार्फत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम समाजहिताचे आहेत.भविष्यातही अशाच सेवाभावी कार्याची परंपरा कायम सुरू राहो,अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली आहे.याच बरोबर पत्रकार डॉ.मनोज गिमेकर व डॉक्टर्स असोसिएशन भोकर चे अध्यक्ष तथा नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतींचे प्रतिनिधी डॉ.फेरोज इनामदार यांनी भोकर शहरासाठी ही रुग्णवाहिका अत्यंत गरजेची असल्याचे सांगत या सेवेचा शहर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल,असा विश्वास व्यक्त केला आहे.तर युवा नेते संदीप पाटील गौड यांनी संस्थेचे कौतुक करत मानवतेसाठी झटणारी संस्था म्हणून तिचा गौरव केला.या रुग्णवाहिका सेवेचा लाभ भोकर व परिसरातील तीन ते चार तालुक्यांतील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी मिळणार असल्याने अनेकांचे प्राण वाचविण्यास ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.या रुग्णवाहिका सेवेच्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी उपरोक्त मान्यवरांसह स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे उपसभापती बालाजी श्यानमवाड,भोकर नगर परिषदचे नगरसेवक योगेश भोकरकर,सुहास पवार,अविनाश वाघमारे,विजय पवार, नगर सेविका प्रतिनिधी सिद्धेश्वर पिटलेवाड, सांप्रदाय तालुका सेवासमितीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.तर सोहळ्याच्या सांगतेला सर्व उपस्थितांचे आभार समितीचे पदाधिकारी साईनाथ बंडोड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close