भोकर : प्रभाग क्र.१ (ब) मधील ‘त्या वादातीत’ उमेदवाराने गाठला लक्ष्मी दर्शनाचा कळस…
'त्या' विशिष्ट मतदारांना मतदान न करण्यासाठी 'दुप्पट भाव' देण्याकरिता हितचिंतकांनी व्ह्यूव रचना आखली असल्याची होत आहे जोरदार चर्चा ?

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मधील प्रभाग क्र.१ (ब) करिता उद्या दि.२० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.सदरील प्रभागात भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांनी वादातीत असलेल्या माजी नगराध्यक्षां विरुद्ध निष्कलंक अशा एका स्वच्छ प्रतिमेच्या माजी नगरसेवकाची लढत होत असल्याने स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांसाठी मतदारांचा कौल अनुकूल असल्याचे बोलल्या जात असून तो कौल हाणून पाडण्यासाठी त्या वादातीत उमेदवाराने विशिष्ट मतदारांना मतदान न करण्यासाठी ‘दुप्पट भाव’ देण्याकरिता प्रभागात आपल्या हितचिंतकांकरवी व्ह्यूव रचना आखली असल्याची चर्चा जोर धरत आहे.त्यांनी लक्ष्मी दर्शनाचा कळस गाठला असला तरी मतदार मात्र आलेल्या ‘लक्ष्मी’चे स्वागत करून स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारालाच प्राधान्य देतील,असे ही अनेकांतून बोलल्या जात आहे.
होऊ घातलेल्या भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्र.१ (ब) करिता उद्या दि.२० डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सदरील प्रभागातून एकूण ६ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.यात भाजपाचे माजी नगराध्यक्ष चिंचाळकर विनोद पुंडलीकराव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक मोहम्मद जवाजोद्दीन मोहम्मद मुनिरोद्दीन बरबडेकर,शिवसेनेचे (शिंदे गट) देशमुख प्रमोद उत्तमराव, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मोहम्मद युसूफ मोहम्मद खाजा,एम. आय.एम.चे मोहम्मद कामरान इकबाल मोमीन व अपक्ष जटालवार साईप्रसाद सुर्यकांतराव या सहा उमदवारांचा समावेश आहे.
अपक्ष उमेदवार जटालवार साईप्रसाद सुर्यकांतराव यांनी भाजपाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष चिंचाळकर विनोद पुंडलीकराव यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीची माहिती लपविल्याचा आक्षेप घेतला असल्याने ही निवडणूक प्रक्रिया उशिरा होत आहे.सदरील आक्षेपाहर्य प्रकरण उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट झालेले आहे.त्यामुळे सदरील वादातीत उमेदवाराने किती संपत्ती दडवली,त्यामध्ये सत्यता कितपत आहे ? हे मा. न्यायालयच ठरविणार आहे.परंतू ह्या सर्व प्रकरणाची खमंग चर्चा मात्र या प्रभागासह संबंध शहरात होत आहे.माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी विकासात्मक कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी भोकर नगर परिषदेला उपलब्ध करून दिला.तसेच हा कारभार पाहण्यासाठी कारभारी म्हणून या माजी नगराध्यक्षावर त्यांनी मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकली होती.असे असले तरी तो निधी भ्रष्टाचाराचे कुरण बनले होते असे अनेकांतून बोलल्या जात आहे.याच बरोबर ‘त्या’ माजी नगराध्यक्षाने नगर परिषदेतील सत्तेच्या काळात गुंठेवारी,फेरफार,बांधकाम परवाना, कर्मचारी भरती, बोगस कामे व गुत्तेदारीतून मोठी माया जमविली,नव्हे तर भ्रष्टाचाराच्या आरोपात त्यांनी तुरुंगवारी देखील केली असल्याची टिका विरोधी उमेदवारांसह अनेक नागरिकांतून केल्या जात आहे.अशा अनेक वादातीत प्रकरणांनी विरोधकांकडून टिकेचा विषय बनलेला ‘तो’ उमेदवार या प्रभागात निवडणूक लढवीत असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
सदरील माजी नगराध्यक्षाने होऊ घातलेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागितली होती.परंतू त्यांचे मागील वादातीत कर्तव्य लक्षात घेऊन पक्षाने ती उमेदवारी दिली नाही.परंतू खासदार अशोकराव चव्हाण यांचे ते अत्यंत निकटवर्तीय वज्ञ विश्वासू असल्याने त्यांना प्रभाग क्र.१ (ब) मध्ये नगरसेवकासाठी उमेदवारी देण्यात आली. मागील काळात एका सभास्थानी काही पत्रकार व नागरिकांनी खासदार अशोकराव चव्हाण यांना सदरील वादातीत माजी नगराध्यक्षांवरील आरोपांविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की,आरोप तर कोणीही कोणाही विरुद्ध करु शकतात,परंतू ते आरोप न्याय प्रक्रियेतून सिद्ध झाल्याशिवाय तो आरोपी ठरत नाही. त्यामुळे मी त्यास दोषी म्हणत नाही,असे स्पष्टीकरण देऊन त्यांनी एकप्रकारे पाठराखणच केली होती.यावरुन असे बोलल्या गेले की,हा उमेदवार खासदार अशोकराव चव्हाण यांचा अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू आहे.यामुळे सदरील उमेदवारास निवडून आणण्यासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने ऐनकेन मार्गाने हा उमेदवार निवडून आणणे अत्यंत गरजेचे आहे.म्हणूनच तर उमेदवार व त्यांच्या हितचिंतकांनी देखील अनेक प्रकारचे लक्ष्मी शक्ती पणाला लावली आहे.तसे पाहता सर्वच उमेदवार घरपोच लक्ष्मीदर्शन करतातच,परंतू या वादातीत उमेदवाराने तर चक्क लक्ष्मी दर्शनाचा कळस गाठला आहे.या प्रभागात बहुसंख्येने मुस्लिम मतदार आहेत.त्यांच्या मतदानातून मुस्लिम उमेदवार विजयी होऊ शकतो.म्हणून त्या मतदारांना अत्यंत जिव्हाळ्याचा ‘भाव’ माजी नगराध्यक्ष उमेवाराकडून दिला जात आहे.मतदान करण्यासाठी जो ‘भाव’ दिला जात आहे,त्यापेक्षा ‘दुप्पट भाव’ त्या उमेदवारांस मतदान न करण्यासाठी दिला जाणार आहे व हे करण्यासाठी प्रभागात हितचिंतकांनी मोठी व्ह्यूव रचना आखली असल्याची चर्चा जोर धरत आहे.
असे असले तरी ज्यांनी आक्षेप घेतला आहे ते अपक्ष उमेदवार जटालवार साईप्रसाद सुर्यकांतराव यांना भ्रष्टाचाऱ्यांच्या कर्दनकाळ समजले जाते.ते देखील प्रभावी लढत देत आहेत.तर मोहम्मद जवाजोद्दीन मोहम्मद मुनिरोद्दीन बरबडेकर यांच्याकडे निष्कलंक माजी नगरसेवक व माजी पंचायत समिती सदस्य म्हणून पाहिले जाते.जवाजोद्दीन बरबडेकर हे खासदार अशोकराव चव्हाण यांचे भोकर विधानसभा मतदार संघात आगमन होण्यापूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे भोकर पंचायत समितीचे सदस्य होते.त्यांचे सेवाभावी कर्तव्य उल्लेखनीय असल्यानेच त्यांना येथील मतदारांनी निवडून दिले होते.परंतू भोकर नगर परिषद स्थापनेसाठी त्यांनी दीड वर्ष कालावधी शिल्लक असतांना ही आपल्या पंचायत समिती सदस्यत्वाचा त्याग केला व नगर परिषद स्थापनेचा ठराव दिला होता.भोकर नगर परिषद स्थापनेत अशा प्रकारे त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच नगर सेवक असतांना देखील त्यांनी जनसेवेला प्राधान्य दिले होते.याच कार्यकाळात आरसीसी स्पन पाईप कारखाण्याची मालमत्ता असलेली गिट्टी,दगड,पाईप व गजाळीची परस्पर विक्री तथा विल्हेवाट तत्कालीन कारभारी आणि मुख्याधिकारी हे लावून मोठी माया जमवित असल्याची बाब त्यांनी उघडकीस आणली होती. यामुळे त्या कारभाऱ्यांसह पक्षश्रेष्ठीची नाराजी त्यांना पत्करावी लागली होती.उच्च शिक्षित व सुसंस्कृत कुटूंबातील आणि निष्कलंक असे कर्तव्यनिष्ठ उमेदवार म्हणून मोहम्मद जवाजोद्दीन मोहम्मद मुनिरोद्दीन बरबडेकर यांच्याकडे पाहिले जाते.खऱ्या अर्थाने ते वादातीत माजी नगराध्यक्ष व निष्कलंक असे माजी नगरसेवक यांच्यात हा निवडणूक लढा होत असल्याची लक्षवेधी चर्चा मतदारांसह अनेकांतून होत आहे.
भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांनी वादातीत असलेल्या माजी नगराध्यक्षां विरुद्ध निष्कलंक अशा एका स्वच्छ प्रतिमेच्या माजी नगरसेवकाची लढत होत असल्याने मतदारांचा कौल स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांकरिता अनुकूल असल्याचे बोलल्या जात आहे.त्यांनी लक्ष्मी दर्शनाचा कळस गाठला असला तरी मतदार मात्र आलेल्या ‘लक्ष्मी’चे स्वागत करून स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारालाच प्राधान्य देतील,असे ही अनेकांतून बोलल्या जात आहे.अवघे काही तास मतदानासाठी व मतमोजणीसाठी उरलेले आहेत.त्यामुळे फार काळ वाट पाहण्याची गरज नसून सुज्ञ मतदार हे विजयाचा कौल कोणाला देतील ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.




