आपलं नांदेडक्राइमनांदेड जिल्हाभोकरराज्य

भोकर पोलीसांनी १ लाख ४ हजार रुपयाच्या मुद्देमालासह बॅटरी चोरांच्या आवळल्या मुसक्या

अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले या पोलीस पथकाचे अभिनंदन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.पाळज येथील जिल्हा परिषद शाळेतील बॅटरी व सोलार उपकरणाची चोरी झाल्याचा गुन्हा भोकर पोलीसात दि.२६ फेब्रुवारी रोजी दाखल झाला होता.गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे अतिशय जलद गतीने तपास करत भोकर पोलीस पथकाने १ लाख ४ हजार रुपयाच्या मुद्देमालासह ‘त्या’ चोरांच्या मुसक्या आवळल्या असून सदरील ३ चोरट्यांत एका विधी संघर्ष वयीन मुलाचा ही समावेश आहे.सदरील चोरीचा गुन्हा अतिशय कमी दिवसांत उघडकिस आणल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भोकर पोलीसांचे अभिनंदनासह कौतुक केले आहे.

जिल्हा परिषद शाळा पाळज,ता.भोकर चे मुख्याध्यापक
प्रशांत विलासराव पत्तेवार (५५) यांनी त्यांच्या शाळेतील सोलार यु.पी.एस.इन्व्हर्टर,बॅटरी व आदी साहित्य दि.२५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता ते दि.२६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान चोरी गेले असल्याची फिर्याद दिल्यावरुन दि.२६ फेब्रुवारी रोजी भोकर पोलीसात<span;> गु.र.नं. ७७/२०२६ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा.न्या.सं.अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रांतर्गतच्या भारताविरुद्ध चे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक यांना आदेशित केले होते. या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक पोलीस पथक कार्यरत केले होते.याच दरम्यान या पथकास जिल्हा परिषद शाळा पाळज येथील शाळेतील चोरी विषयी गोपनीय माहिती मिळाली.ही माहिती त्यांनी वरीष्ठांना कळविली व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,भोकर च्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,भोकर चे उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी जमादार बालाजी लक्षटवार यांना तपासचक्र गतिमान करण्यासाठी आदेशित केले.

यानुसार जमादार बालाजी लक्षटवार हे तपास करत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,महागाव ता.भोकर येथील एक जण त्या गुन्ह्यात आहे.ही माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना दिली असता पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी जमादार बालाजी लक्षटवार यांना तपासात सहकार्य करण्यासाठी जमादार सोनाजी कानगुले,जमादार राजेश घुन्नर,पो.कॉ.भागवत चिंचाणे,पो.कॉ.गुरुदास आरेवार व महिला जमादार सीमा वच्चेवार यांना मदतनीस म्हणून दिले.या पोलीस पथकाने तपासचक्र गतिमान करुन सीसीटीव्ही च्या आधारे प्रथम एका आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य साथीदारांची नावे पोलीसांना सांगितले. त्यावरुन अन्य दोघांना पोलीसांनी त्याब्यात घेतले.त्यातील दोघांची नावे विकास दिलीप मेटपेलवार(२०)रा.महागाव ता.भोकर व सूर्यकांत लक्ष्मण बोलकर (२०)रा.पाळज ता. भोकर असून तिसरा आरोपी हा विधी संघर्ष वयीन आहे.

या तिघांना ताब्यात घेऊन असून चौकशी केली असता त्यांच्याकडे जिल्हा परिषद शाळा पाळज येथील चोरीतला मुद्देमाल मिळून आला.यावेळी त्यांच्यासह १६ हजार रुपये किमतीचे लिव्हगार्ड सोलार यू.पी.एस.(इन्व्हर्टर),१८ हजार रुपये किमतीची लिवसर्व कंपनीची बॅटरी,६० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल व १० हजार रुपये किंमतीचे अन्य साहित्य असा एकूण १ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.सदरील पोलीस पथकाने हा गुन्हा मोठ्या शिताफीने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला,ही बाब अभिनंदनीय असल्याने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या पथकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुकासह अभिनंदन केले आहे.तर पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास जमादार बालाजी लक्षटवार हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close