पोटच्या दोन लेकरांची निघृणपणे हत्या करणाऱ्या मातेस भोकर जिल्हासत्र न्यायालयाने दिली ५ वर्षांची शिक्षा
ती मनोरुग्ण असल्याने ३०२ ऐवजी ३०४ कलमान्वये दिली दिली शिक्षा ; तर पुराव्या अभावी दोघांची केली निर्दोष मुक्तता

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : पोटच्या दोन निष्पाप चिमुकल्या लेकरांची अमानुषपणे हत्या करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पांडूरणा ता.भोकर येथील धुरपताबाई गणपत निमलवाड या २९ वर्षीय मनोरुग्ण आईस भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.वैद्यकीय अहवालानुसार ती मनोरुग्ण ठरल्याने ३०२ ऐवजी ३०४ कलमान्वये तिला ही शिक्षा दिली असून अन्य दोघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पांडूरणा ता.भोकर या गावात सन २०२२ मध्ये मन हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली होती. त्याविषयी थोडक्यात असे की,धुरपतबाई गणपत निमलवाड या महिलेस दत्ता नावाचा २ वर्षीय मुलगा व ४ महिन्याची अनुसया नावाची मुलगी असे २ अपत्य होती. दि.२ जून २०२२ रोजी ही २ चिमुकली लेकरे भुकेने व्याकुळ झाल्यामुळे सतत रडत होती.यामुळे धुरपताबाई निमलवाड या आईस राग आल्याने तिने अवघ्या ४ महिन्याच्या अनुसया या निष्पाप मुलीचे तोंड दाबून जीव घेतला व तिचा मृतदेह पांडूरणा गावाजवळील पुलाखाली मातीत पुरून टाकला.तर दत्ता या २ वर्षीय मुलाच्या नाका तोंडात चिखल घालून त्याचा ही जीव घेतला व त्याचा मृतदेह मौ.मुगट शिवारातील माता साहेब गुरुद्वारासमोरील उसाच्या शेतातील पांदण रस्त्यात टाकून दिला.ही बाब निदर्शनास आल्याने तिने दुर्दैवी मयत दोन्ही चिमुकल्या लेकरांचे मृतदेह गावाकडे आणून जाळून टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिची आई कोंड्याबाई पांडुरंग राजेमोड (वय ५० वर्ष) व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड(वय २५ वर्ष) दोघेही रा.ब्राह्मणवाडा तालुका मुदखेड यांनी सहकार्य केले असे बोलल्या गेले.
हृदय हेलावून टाकणारी ही दुर्दैवी हत्येची घटना निमलवाड कुटूंबियांना समजल्यावरुन धुरपताबाई निमलवाड हिचे सासरे गोविंद दगडुजी निमलवाड (वय ८५ वर्ष) यांनी तात्काळ भोकर पोलीस ठाणे गाठले व या घटनेविषयी रितसर फिर्याद दिली.यावरुन गु.र.नं.१९५/ २०२२ कलम ३०२,२०१,३४ भा.द.वि.प्रमाणे धुरपताबाई गणपत निमलवाड (आई),रा.पांडुरणा ता. भोकर,जि.नांदेड व तिची आई आणि भाऊ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील गुन्ह्यांचे तत्कालीन तपासणीक अधिकारी पो.उप.नि. दिगंबर पाटील यांनी पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास केला व तपासाअंती भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दरम्यानच्या काळात भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड.सौ.अनुराधा रेड्डी डावकरे यांनी महत्वाचे ६ साक्षीदार तपासले.घटनेच्या वेळी आरोपीची मानसिक स्थिती स्थिर होती आणि तिला कृत्याची जाणीव होती,असा युक्तिवाद ही सरकारी वकीलांनी केला.परंतू आरोपीच्या वकिलांनी ती मनोरुग्ण असल्याचा युक्तिवाद केला.यामुळे सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालाचा (Medical Report) न्यायालयाने गांभीर्याने विचार केला.सदरील अहवालानुसार आरोपी महिला मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्याने भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मोहम्मद नासीर मोहम्मद सलीम यांनी आरोपी महिलेस(मयत लेकरांच्या आईस) कलम ३०२ (उद्देशपूर्वक हत्या) अंतर्गत दोषी न धरता, कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अन्वये ५ वर्षांचा सश्रम कारावास व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ अंतर्गत २ वर्षांची शिक्षा आणि दोन्ही कलमांतर्गत प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.तर तिला सहकार्य केल्याचा आरोप असलेले तिचे आई व भाऊ हे पुराव्या अभावी दोषी न ठरल्याने या दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली.हा महत्वपूर्ण निकाल भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दि.२० मे रोजी दिला असून या खटल्यात पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व भोकर अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ए.एस.आय. फिरोजखान पठाण यांनी सहकार्य केले.




