२६ सप्टेंबर पर्यंत भोकर तालुक्यातील २५.३८ टक्के अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड
पोर्टलवर नावे अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर असून त्या शेतकऱ्यांनी व्हीके नंबरची केवायसी करावी-तहसिलदार विनोद गुंडमवार

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्रात अतिवृष्टीने कहर केला असून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीत भोकर तालुक्यातील ४३ हजार ८७४ शेतकऱ्यांच्या तब्बल ३७ हजार ४०६ हेक्टर जमीन क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून राज्य शासनाने बाधीत क्षेत्रासाठी घोषित केलेल्या सानुग्रह अनुदान निधी पैकी या शेतकऱ्यांसाठी केवळ ३१ कोटी ८७ लाख ६० हजार ५०० रुपये अनुदान निधी मंजूर करण्यात आला आहे.हे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना मिळावे यासाठी त्यांची नावे डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर असून दि.२६ सप्टेंबर पर्यंत एकूण बाधीत शेतकऱ्यांपैकी २५.३८ टक्के अर्थातच १० हजार ५३२ शेतकऱ्यांची नावे भोकर महसूल विभागाने अपलोड केली आहेत. उर्वरीत नावे ही अपलोड करणे सुरु असून ज्यांची नावे अपलोड झाली आहेत व होत आहेत त्या शेतकऱ्यांनी आपापल्या गावच्या ग्राममहसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्हीके नंबरची खात्री करून केवायसी करुन घ्यावी,असे आवाहन भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.
यावर्षी महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला आहे.त्यातील नांदेड जिल्ह्याला मोठ्या नुकसानीचा फटका बसला असून जिल्ह्यातील भोकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले आहे.यात ७९ गावातील ४३ हजार ८७४ शेतकऱ्यांच्या तब्बल ३७ हजार ४०६ हेक्टर जमीन क्षेत्रावरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीने बाधीत झालेल्या राज्यातील एकूण क्षेत्रासाठी राज्य सरकारने जो सानुग्रह नुकसान भरपाई अनुदान निधी घोषित केला आहे,त्यापैकी भोकर तालुक्यासाठी केवळ ३१ कोटी ७८ लाख ६० हजार रुपये अनुदान निधी मंजूर केला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले असून तो मेटाकुटीला आला आहे. दसरा व दिवाळी सण साजरा होईल किंवा नाही या पेक्षा कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा पुढील प्रश्न कसा सुटेल ? ही चिंता सर्व शेतकयांना भेडसावत आहे.सरकारने हेक्टरी (केवळ २ हेक्टर मर्यादेत)८ हजार ५०० रुपये अनुदान निधी देण्याचे ठरविले असल्याने तो खुपच तुटपुंजा आहे.
हेक्टरी किमान २५ ते ५० हजार रुपये नुकसान भरपाई निधी मिळावा अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.ही अपेक्षा सरकार पूर्ण करु शकत नसले तरी जो निधी मंजूर करण्यात आला आहे तो शेतकऱ्यांच्या पदरात तात्काळ पडावा यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले,भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरचे तहसिलदार विनोद गुंडमवार, महसूल विभाग नायब तहसिलदार सय्यद उमर,सहा.महसूल अधिकारी विशाल चौधरी,सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्याचे काम करत आहेत.नावे अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर असून एकूण ७९ बाधीत गावांपैकी ३३ गावांतील जवळपास १० हजार ५०० बाधीत शेतकऱ्यांची नावे दि.२६ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.एकूण बाधीत शेतकऱ्यांपैकी २५.३८ टक्के नावे व त्यांना वाटपासाठी लागणारा ८ कोटी ८९ लाख १ हजार ५८० रुपये अनुदान निधी पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे.उर्वरीत ४६ गावांतील ३३ हजार ३४२ बाधीत शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर असून त्यांच्यासाठी लागणारा २३ कोटी ७८ लाख ६८ हजार ९२० रुपये निधी अपलोड करण्यात येणार आहे. ज्या गावांतील बाधीत शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड झाली आहेत व पुढे होणार आहेत त्या गावच्या शेतकऱ्यांनी आपापल्या गावच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व आपले नाव पोर्टलवरील यादीत आले असेल तर त्या संबंधित व्हीजे नंबर घ्यावा.तसेच अनुदान प्राप्तीसाठी ई-केवायसी कयणे गरजेचे असल्याने तात्काळ केवायसी करुन घ्यावी,असे आवाहन भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.




