भोकर येथे उद्या द्वितीय राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची होणार आहे निवड चाचणी
वाई,जि.सातारा येथे दि.८ ते ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होत आहे द्वितीय राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धा


अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : वाई,जि.सातारा येथे द्वितिय राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धेचे दि.८ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.सदरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या संघातील खेळाडूंची निवड चाचणी दि.१ नोव्हेंबर रोजी भोकर येथील मंजुळाबाई किन्हाळकर विद्यालय भोकर येथे सकाळी होणार असून खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन,महाराष्ट्र दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष उत्तम बाबळे व सचिव तथा मुख्य प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांनी केले आहे.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून दांडपट्टा ही लढवय्यी शस्त्र विद्या व क्रीडा कला महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहे.ही क्रीडा कला पुनर्रजिवित व्हावी व खेळाडूंनी देखील जीवित ठेवावी यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने दांडपट्ट्यास ‘राज्य शस्त्र’ म्हणून घोषित केले आहे.तेव्हांपासून दांडपट्टा कला क्रीडेची राजधानी म्हणून व शूरविरांची भूमि म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.सदरील स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष असून देवगिरी लॉन,वाई वाठार रोड, जोशी विहीर ता.वाई जि.सातारा येथे दि.८ ते ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दरम्यान द्वितीय राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील दांडपट्टा खेळाडू व संघ ही यात सहभागी व्हावा या उद्देशाने नांदेड जिल्हा दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दि.३० ऑक्टोबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मंजुळाबाई किन्हाळकर मुलींची शाळा भोकर जि.नांदेड येथे दांडपट्टा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्य कराटे प्रशिक्षक तथा दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन जिल्हा नांदेड चे सचिव बालाजी एल.गाडेकर आणि पहिली राष्ट्रीय दिग्विजेती दांडपट्टा सिनियर खेळाडू कु.सलोनी विनोद सुरदसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे.सदरील प्रशिक्षण शिबिरात येणाऱ्या मुला-मुलींना विविध स्तरावर चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले जात आहे.तसेच टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या माध्यमातून ही विविध कला व क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण खेळाडूंना येथे मिळत असून उत्तम प्रशिक्षित खेळाडूंना भविष्यातील उज्वल यशासाठी सुवर्णसंधी प्राप्त करुन दिली जात आहे.अशाच खेळाऊ वाई जि.सातारा येथे होणार असलेल्या द्वितीय राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धेतून सुवर्ण संधी मिळणार आहे.म्हणून त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील दांडपट्टा खेळाडू व संघाची निवड करण्यात येणार आहे.यासाठी दि.१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी मंजुळाबाई किन्हाळकर मुलींची शाळा भोकर येथे निवड चाचणी घेतली जाणार आहे.निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक तथा दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे नांदेड चे सचिव बालाजी गाडेकर यांच्याशी मो.क्र.9921855097 वर संपर्क साधावा.तसेच अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष उत्तम बाबळे यांनी केले आहे.





