भोकर पोलीसांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
माधव मेहनतकर,गणेश बोईनवाड व दिव्यरत्न पाटील हे ठरले स्पर्धेचे विजेते मानकरी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ १५० एकता अभियान’ अंतर्गत दि.३१ ऑक्टोबर ते दि.१५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याच अनुषंगाने भोकर पोलीस ठाण्याच्या वतीने दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सदरील स्पर्धेचे विजेते मानकरी ठरलेल्या माधव मेहनतकर, गणेश बोईनवाड व दिव्यरत्न पाटील यांना उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.हाके यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले आहे.
‘सरदार @ १५० एकता अभियान’ अंतर्गत दि.३१ ऑक्टोबर ते दि.१५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माय भारतच्या नेतृत्वाखाली ‘सरदार@ १५० युनिटी मार्च’ या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.देशातील युवकांमध्ये एकता,देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणे हे आहे या अभियानाचा उद्देश आहे. याच बरोबर युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि नागरी सहभागातून ‘एक भारत,आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.या कालावधीत पदयात्रा,मॅरेथॉन स्पर्धा व विविध स्पर्धा आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.तसेच डिजिटल फेसवर सोशल मीडिया रील स्पर्धा,निबंध स्पर्धा,सरदार @यंग लीडर्स प्रोग्राम अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा,आरोग्य शिबिरे,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर व्याख्याने,ड्रग्जमुक्त भारत प्रतिज्ञा यांसह आदी उपक्रमांचा यात समावेश आहे.
याच अनुषंगाने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,भोकर अप्पर पोलीस अधीक्षक सौ.अर्चना पाटील, भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०६:३० ते ०७:१५ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन केले होते.आद्य क्रातीगुरु लहुजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याने निघालेल्या मॅरेथॉन दौंड स्पर्धेचा समारोप भोकर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात करण्यात आला.सदरील स्पर्धेत एकूण १२५ जणांनी सहभाग घेतला होता.तर या स्पर्धेत माधव तुकाराम मेहनतकर रा.सोनारी,ता.भोकर,गणेश विश्वंभर बोईनवाड रा.तळ्याचीवाडी ता.हदगाव व दिव्यरत्न रामा पाटील रा.शनी मंदिर मुदखेड रोड भोकर हे तिघे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय विजेते मानकरी ठरले.
सदरील विजेत्यांचा बक्षिस वितरण सोहळा भोकर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात संपन्न झाला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.हाके यांच्या हस्ते उपरोक्त विजेत्यांना अनुक्रमे पारितोषिकपर २१००,१५०० व ११०० रुपये रोख रक्कम,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच अन्य तीन स्पर्धकांना देखील उत्तेजनार्थ बक्षिस देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक अजित कुंभार,सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव,पोलीस उपनिरीक्षक राम कराड, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद बाचेवाड,पोलीस उपनिरीक्षक मोहन राठोड,गोपनीय शाखेचे पो.कॉ.परमेश्वर गाडेकर,पो. नि.रायटर पो.कॉ.जी.एन.आरेवार,लेखनिक हावलदार सिमा वच्छेवार,जमादार खिल्लारे,भीमराव जाधव,पो.काॅ. एकुलवार,महिला पो.काॅ.वाघमारे,पवार यांसह आदींची उपस्थिती होती.तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपरोक्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान यांसह आदींनी परिश्रम घेतले.




