अल निनो चे सावट : शेतकऱ्यांनी कमी पावसावर येणाऱ्या पिकांची निवड करावी – दिलीप जाधव
खरीप हंगाम पेरणीपुर्व नियोजनासाठी भोकर तालुक्यात कृषीरथाद्वारे होत आहे जनजागृती

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : २०२६ च्या खरीप हंगामावर अल निनोचे सावट असल्याचा अंदाज हवामन तज्ञांनी व्यक्त केला असल्याने पावच्याच्या एकूण सरासरी टक्केवारीवर त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीचे योग्य नियोजन करावे व कमी पावसावर येणाऱ्या पिकांची निवड करुन होणारे नुकसान टाळावे,यासाठी राज्य शासन कृषि विभागाने शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी जनजागृती अभियान सुरु केले आहे.याच अनुषंगाने भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषीरथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली असून दि.१२ जून रोजी या जनजागृती कृषीरथाचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांवर कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट असते.आस्मानी संकटात अतिवृष्टी,ओळा दुष्काळ व कोरडा दुष्काळ,तर सुलतानी संकटात बी-बियाणे,खते टंचाई व वाढत्या किमती आणि उत्पादनास हमी भावाच्या शास्वतीचा अभाव.एकूणच शेतकऱ्यांना सतत आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते,हे नेहमीच निदर्शनास येते.यावर्षी तर खरीप हंगामावर अल निनो चे सावट असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या पावसाची पार्श्वभूमी पाहता यावर्षी अल निनोमुळे पावसाच्या एकूण सरासरी टक्केवारीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.हे होऊ नये व शेतकऱ्यांना पेरणी पुर्वी योग्य माहिती मिळावी म्हणून राज्य शासनाच्या कृषि विभागाने जनजागृती अभियान हाती घेतले आहे.त्याच अनुषंगाने भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने एका कृषीरथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.कृषीरथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली असून दि.१२ जून २०२६ रोजी शेतकरी,शेतकरी,कृषि अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव व जेष्ठ पत्रकार राजेश वाघमारे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा संपादक उत्तम बाबळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून त्या कृषीरथाची तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथून रवानगी करण्यात आली.या कृषीरथाद्वारे पुढील ३ दिवस तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना हवामान बदल,पीक नियोजन आणि दुष्काळ व्यवस्थापनाबाबत पत्रके व ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. https://youtu.be/RdnUva394KA?si=p5V7950KJT8Qu29w
यावेळी तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी म्हटले आहे की,हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा अल निनोचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असून प्रतिवर्षाच्या एकूण सरासरीच्या प्रमाणपत्र घट होऊन ९० टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी पावसावर तग धरणारी व अल्प कालावधीत तयार होणारी पिके निवडावीत.तसेच किमान २ ते कमाल ३ पिकांचे नियोजन करून अंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. बियाणांची उगवण शक्ती तपासणी करावी व नंतरच पेरणी करावी.तसेच बी-बियाणे व खते परवानाधारक विक्रेत्यांकडूनच घ्यावीत आणि ते घेतांना त्यांच्याकडून पक्की पावती घ्यावी,रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवून सेंद्रिय व जैविक खतांना प्राधान्य द्यावे,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.कृषीरथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन,जलसंधारण आणि हवामानानुसार शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार असून या जनजागृती कृषीरथाच्या शुभारंभ प्रसंगी व रवानगी समयी मंडळ कृषी अधिकारी अविनाश टोंपे,जयपाल पाईकराव,सुनील सूर्यवंशी,सतीश कराळे,आनंद बोईनवाड,रवी तांडे,शिवदर्शन घुमनवाड, चिंतामण गडगिले,शुभांगी आपटे,शिल्पा भक्ते, गंगासागर माहुरे,रेणूका आवरुल, पत्रकार विशाल जाधव यांसह अधिकारी,कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.




