देश,धर्म व संस्कृती जपण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अत्यंत आवश्यकता आहे-साध्वी मुक्तीनाथ
भोकर मध्ये शतकोत्तरी संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन पुष्पवृष्टीत संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तत्कालीन मराठवाड्याचे भुमिपूत्र झाले.डॉ. बळीराम हेडगेवार यांनी सन १९२५ मध्ये परकीय आक्रमणे व हिंदूंवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.यातून निस्वार्थी व त्यागरुपी असंख्य स्वयंसेवक घडविले गेले आहेत.त्यांच्या सेवाभावी कर्तव्यातून बलशाली देश घडविण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच देश,धर्म व संस्कृती जपण्यासाठी देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अत्यंत आवश्यकता आहे.असे प्रतिपादन श्रीनाथगडी तपोवन आश्रम संस्थान,टाकराळा ता. बाढोणा(हिमायतनगर)जि.नांदेड येथील बालयोगिनी मुक्तीनाथ गुरु श्री महेश्वरीनाथ यांनी व्यक्त केले.दि.२ ऑक्टोबर रोजी भोकर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपुर्ती पथसंचलन व शस्त्रपुजन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपुर्ती वर्षानिमित्त दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी दिनी सकाळी ११:०० वाजता मारोती मंदीर,तेली गल्ली भोकर येथून शहरातील मुख्य रस्त्याने संघाच्या पारंपरिक सहवाद्यात स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन झाले.यावेळी रस्ते रांगोळ्यांनी सजली होती व ठिकठिकाणी महिलांनी स्वयंसेवकांचे पुष्पवृष्टीने भव्य स्वागत केले.पथसंचलनाच्या समारोपानंतर शस्त्रपुजन व बौद्धिकाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संघाचे नांदेड विभाग कार्यवाहक हेमंत सोपानराव इंगळे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून बालयोगिनी मुक्तीनाथ गुरु श्री महेश्वरीनाथ यांची उपस्थिती होती.प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना हेमंत इंगळे म्हणाले की,संघात कोणासही गुरु न मानता भगव्या ध्वजाला गुरुस्थान दिले गेले व त्यास त्याग,शिस्त व राष्ट्रभक्तीचे प्रतिक मानून त्याखाली सर्व स्वयंसेवकांना संघटित होण्याचे घडे दिले गेले.संघाने त्यागमुर्ती स्वयंसेवक घडविण्याचे काम केले असून आज या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे व तब्बल ८० देशांमध्ये संघाचे स्वयंसेवक आपत्ती निवारण, राष्ट्र,धर्म संरक्षण व सेवाभावी सामाजिक कार्य करत आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना बालयोगिनी मुक्तीनाथ गुरु श्री महेश्वरीनाथ पुढे म्हणाल्या की,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचा स्वाभिमान बाळगणे शिकवितो.देव,धर्म,देश व देशभक्ती या मुलमंत्रापासून स्वयंसेवक कधीच विभक्त होऊ शकत नाहीत.त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकता व अखंडता टिकून आहे,असे ही त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पथसंचलनात पारंपारिक गणवेशातील असंख्य स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. तर सदरील पथसंचलन व शस्त्रपुजन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोकर नगर कार्यवाहक संतोष कदम,शंकर पसनूरवार,अनंता जोशी,प्रा.डॉ.व्यंकट माने,नरेंद्र जोशी, चंद्रकांत चक्रवार,बालाजी बच्चेवार,नारायण सादूलवार, दिनेश लक्षटवार,प्रशांत पोपशेटवार,साईदास माळवंतकर यांसह आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी शहरातील भाजपा,हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,महिला भगिनी व आदी देशभक्त नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.तसेच कायदा, शांतता,सुव्यवस्था व संरक्षणासाठी पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.




