रायखोडची आजारी महिला पैशासाठी थेट रुग्णवाहिकेतून आली भोकरच्या पोस्ट कार्यालयात…
"माझी पत्नी मरणाच्या दारात आहे....आम्हाला पैसे द्या साहेब",म्हणताच क्षणाचा ही विलंब न करता पोस्ट मास्तरने 'महिला सन्मान योजनेचे गुंतवणूक केलेले त्या महिलेचे जमा असलेले पैसे देऊन दाखविली कर्तव्य तत्परता...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मौ.रायखोड ता.भोकर येथील ७२ वर्षीय वयोवृद्ध महिला विठाबाई मारुती मोरे यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान तिच्याकडील पैसे संपल्याने सदरील रुग्णालयाने पुढील उपचार थांबविले होते.उपचार करणे गरजेचे असल्याने तिच्या पतीने पैसे लवकरच जमा करु,आपण उपचार सुरू ठेवावेत अशी विनंती केली.परंतू त्या रुग्णालय प्रशासनाने त्यांची विनंती मान्य न केल्याने पैशासाठी गंभीर आजारी असलेल्या त्या महिलेला अद्यावत रुग्णवाहिकेतून थेट भोकर येथील पोस्ट कार्यालयात यावे लागले.तिच्या पतीने पोस्ट मास्तर यांना विनंती केली की,आपल्या कार्यालयातील एका योजनेत जमा असलेली रक्कम द्यावी.सदरील महिलेची अवस्था पाहून पोस्ट मास्तर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसलाही विलंब न करता व अन्य कामे बाजूला ठेवून तत्परतेने त्या महिलेची खाती तपासली आणि महिला सन्मान योजनेत जमा असलेली तिची रक्कम थेट रुग्णवाहिकेत नेऊन तिच्या स्वाधीन केली.
अद्यावत रुग्णवाहिकेतून एक आजारी वयोवृद्ध महिला थेट पोस्ट कार्यालय भोकर येथे दि.९ ऑक्टोबर २०२५ रोजी आली होती.पोस्ट कार्यालयात आजारी महिला का आली आहे? हे पाहण्यासाठी पोस्ट मास्तर एस.नलावाड हे त्या रुग्णवाहिकेतजवळ गेले व चौकशी केली असता त्या आजारी महिलेचे नाव विठाबाई मारुती मोरे(७२) रा. रायखोड ता.भोकर असल्याचे समजले.ती एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याने नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती.दरम्यानच्या काळात तिच्या जवळील पैसे संपल्याने त्या रुग्णालयाने पुढील उपचार थांबविले होते.यावेळी तिच्या पतीने रुग्णालय प्रशासनास विनंती केली की,भोकर च्या पोस्ट कार्यालयात माझ्या पत्नीच्या खात्यात एका योजनेचे पैसे आहेत ते काढून आणून देतो आपण उपचार सुरु ठेवा.परंतू सदरील रुग्णालयाने कसलीही माणूसकी दाखविली नाही व उपचार बंद केले.
त्यामुळे सदरील महिलेच्या पतीने तिला चक्क अद्यावत रुग्णवाहिकेतून भोकर येथील पोस्ट कार्यालयात आणले होते.यावेळी पोस्ट मास्तर एस.नलावाड यांना तिच्या पतीने विनंती केली की,साहेब माझ्या पत्नीच्या उपचारासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता आहे,मला तिचा जीव वाचवायचा आहे,ती मरणाच्या दारात आहे म्हणून तिला रुग्णवाहिकेतून तुमच्या दारात आणलो आहे,तरी तिच्या खात्यातील गुंतवणूकीची जमा रक्कम द्यावी.हे ऐकून पोस्ट मास्तर यांनी आपली यंत्रणा हलवली व तिचे खाते तपासले असता त्या खात्यात महिला सन्मान योजनेच्या गुंतवणूकीचे पैसे जमा होते.ती रक्कम काढण्यात आली व पोस्ट मास्तर एस.नलावाड आणि डाक सहायक स्नेहकांता गायकवाड यांनी कसलाही विलंब न करता पोस्ट कार्यालया बाहेर उभी असलेल्या रुग्णवाहिकेत जाऊन ती जमा रक्कम त्या आजारी महिलेच्या स्वाधीन केली.त्या रुग्णालयाने आजारी महिलेच्या पतीवर विश्वास ठेवला नाही उपचार थांबवून माणूसकीची हद्द पार केली.परंतू पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मात्र अतिशय तत्परतेने कर्तव्य बजावून माणूसकी दाखविली.यामुळे गहिवरलेले तिचे पती मारुती मोरे व नातेवाईकांनी त्या सर्वांचे ऋण व्यक्त केले. यावेळी डाक सहायक कैलास पाटील,विजयकुमार कदम, शैलेश चक्रवार यांसह अन्य कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.पैसे वेळेवर मिळाल्याने ती आजारी महिला पुढील उपचारासाठी त्याच रुग्णवाहिकेतून परत नांदेड येथे रवाना झाली.हा दिवस जागतिक डाक दिवस होता.आणि याच दिवशी आजारी महिलेसाठी पोस्ट मास्तर व कर्मचाऱ्यांना तत्परतेने कर्तव्य बजावता आले.या कर्तव्यातूनच त्यांनी जागतिक डाक दिन साजरा केला,हा एक योगायोगच म्हणावा लागेल.




