भोकर पंचायत समितीवर तब्बल ६३ वर्षात अनुसूचित जातीच्या सभापतीला मिळणार आहे केवळ दुसऱ्यांदा संधी
सभापती पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव ; परंतू गण अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वसाधारण

देवठाणा- अनुसूचित जाती राखीव गणातून जर पुरुष निवडून आला तर सभापतींची खुर्ची रिक्त राहणार ?
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : भोकर पंचायत समितीची पहिली सार्वत्रिक निवडणूक सन १९६२ मध्ये झाली.तेंव्हापासून ते होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकी पर्यंत १५ सभापतींनी खुर्ची सांभाळली.यात अनुसूचित जाती प्रवर्गातील केवळ एकास सभापती होण्याची संधी मिळाली.तर आता दुसऱ्यांना संधी मिळणार आहे.परंतू राज्य निवडणुक आयोगाच्या नियमावलीनुसार ५३-देवठाणा गण हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झालेला असतांना सदस्य आरक्षण सोडतीत मात्र तो अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वसाधारण झाल्याने या गणातून जर पुरुष निवडून आला तर सभापती पदाची खुर्ची रिकामीच राहणार काय ? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या सोडतीवर हरकत घेतली जाणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
राज्य निवडणूक आयोग व नांदेड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भोकर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- २०२५ करिता ६ सदस्यांसाठी प्रवर्ग निहाय गणांची आरक्षण सोडत जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम,२०२५ नुसार नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या उपस्थितीत आणि प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या अधिपत्याखाली दि.२३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या बैठक कक्षात संपन्न झाली.

प्रवर्ग निहाय अनुसूचित जातीकरिता राखीव,अनुसूचित जमातीकरिता राखीव, नागरिकाच्या मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिला करिता झालेल्या सोडतीत भोकर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी प्रवर्ग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे आहे.५३ देवठाणा-अनुसूचित जाती,५४ पाळज-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग,५५ भोसी-अनुसूचित जमाती,रिठ्ठा-सर्वसाधारण महिला,५७ सोनारी-सर्वसाधारण महिला,आणि ५८ पिपळढव-सर्वसाधारण महिला.तर यातील विशेष बाब म्हणजे यापुर्वी ५७ हळदा गणाच्या नावात बदल होऊन ते ५७ सोनारी असे करण्यात आले आहे.तसेच झालेल्या आरक्षण सोडतीची प्रक्रीया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार रामेश्वर सावते, नायब तहसिलदार महसूल सय्यद उमर,महसूल सहाय्यक प्रशांत गोडबोले,सहा.महसूल अधिकारी सतीश कदम, संगणक चालक संजय सुर्यवंशी यांनी परीश्रम घेतले.
भोकर पंचायत समितीवर तब्बल ६३ वर्षात अनुसूचित जातीच्या सभापतीला मिळणार आहे केवळ दुसऱ्यांदा संधी

भोकर पंचायत समितीची पहिली सार्वत्रिक निवडणूक सन १९६२ मध्ये पार पडली.यावेळी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती आताच्या उमरी तालुक्याच्या समाविष्टतेत होती.पहिली निवडणूक ९ सदस्यांसाठी झाली व पहिले सभापती म्हणून माजी आमदार स्व. बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांना मान मिळाला.यानंतर ई.पी.पाटील, गोविंदराव शिरूरकर,देशमुख अप्पाराव तातेराव(यांनी दि.२६ नोव्हेंबर १९७९ ते ३० जून १९९० व १४ मार्च १९९२ ते १३ मार्च १९९७ पर्यंतचा प्रदिर्घ कार्यकाळ सभापती पद उपभोगले),ॲड.भाऊसाहेब गोरठेकर,शिवाजीराव वाकदकर,रमेश भुजगराव सरोदे हे सभापती झाले.यानंतर दि.२१ फेब्रुवारी १९९९ रोजी उमरी तालुक्याची निर्मिती झाली व उमरी पंचायत समिती स्वतंत्र झाली आणि कार्यक्षेत्र कमी होऊन भोकर पंचायत समिती ही ६ सदस्यांची झाली.त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून सौ.नरसाबाई ल.गोपतवाड,संभाजी नागोराव झाडे,कोंडलवार गोविंदराव बाबागौड पाटील,देवतूळे शिवाजी लिंबाजी,श्रीमती जाधव कमलबाई पाडुरंग, झिमाबाई गुलाब चव्हाण व श्रीमती निता व्यंकटेश रावलोड यांनी सभापती पद उपभोगले.यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील ४ सभापतींनी व अनुसूचित जाती प्रवर्गातील रमेश भुजगराव सरोदे यांनी सभापती पद उपभोगले.उमरी पंचायत समितीच्या निर्मिती अगोदर भोकर पंचायत समितीचे ते एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गातील सभापती होते.तर भोकर पंचायत समितीची स्वतंत्र निर्मिती झाल्यानंतर होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले व तब्बल ६३ वर्षाच्या कालावधीतले दुसरे सभापती होण्याची संधी यावेळी होणाऱ्या सभापतीस मिळणार आहे.
सभापती पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव ; परंतू गण अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वसाधारण…
आरक्षण सोडतीतून भोकर पंचायत समितीच्या सभापतीचे पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी निश्चित झाले आहे.परंतू सदस्यांच्या गण निहाय आरक्षण सोडतीत ५३ देवठाणा गण हा अनुसूचित जाती सर्वसाधारण करिता सोडण्यात आला आहे.सदरील गणातून महिला किंवा पुरुष हे दोघेही उमेदवारी नामनिर्देशित करु शकतात.त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या गणात विसंगती निर्माण झाली आहे.सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने सर्व पक्ष व अपक्षांनी महिला उमेदवार यात उभे केले तर योग्य ठरेल. परंतू काही सक्षम पुरुष उमेदवार उभे राहिले व योगायोगाने मतदारांनी पुरुष उमेदवार निवडून दिला तर सभापती पदासाठी मोठा पेच निर्माण होणार आहे.नव्हे तर राखीव पद महिलेसाठी असल्याने त्या पदावर पुरुष सदस्य विराजमान होऊ शकणार नाही व सभापती पदाची खुर्ची रिकामीच राहणार असे होईल आणि पुढील कार्यकाल उपसभापतींच्या अधिपत्याखाली जाईल ? असे झाले आहे. त्यामुळे यावर हरकत घेणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकत घेता येऊ शकते.तसेच यासाठी दि.१४ ऑक्टोबर २०२५ ते दि.१७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे हरकत नोंदविता येणार असून ती हरकत कोणी नोंदविल की,हरकतीविना आरक्षण सोडत ‘जैसे थे’ ठेवून निवडणूक पार पडेल? आणि पुरुष उमेदवार निवडून आला तर सभापती पदाची खुर्ची रिकामीच राहिल काय? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.




