महायुती फिस्कटली ? तर पिंपळढव गटात दोन माजी जि.प.सभापतींमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता..!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार)कडून माजी जि.प. कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर ; तर भाजपाकडून माजी जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती प्रकाश देशमुख भोसीकर आणि किशोर पाटील लगळूदकर यांची उमेदवारीसाठी राहणार दावेदारी...

उत्तम बाबळे,संपादक
भोकर : नांदेड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांकरीता गटनिहाय आरक्षण सोडत झाली.यात भोकर तालुक्यातील २९-पिंपळढव गटाचे आरक्षण- सर्वसाधारण (ओपन) करिता सुटले असल्याने अनेक जण या गटातून लढण्यासाठी इच्छूक असले तरी महायुती फिस्कटली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर चे जिल्हाध्यक्ष माजी जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर आणि भाजपाकडून माजी जि. प.कृषि व पशुसंवर्धन सभापती प्रकाश देशमुख भोसीकर यांच्यात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता असून याच गटातून लढण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी ही दावेदारी दर्शविली असल्याने भाजपाच्या या दोघांपैकी कोणास उमेदवारी मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत झाली.भोकर तालुक्यातील तीन गटांचे आरक्षण पुढील प्रमाणे सोडण्यात आले.२७-पाळज- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,२८-भोसी-अनुसूचित जमाती (स्त्री्),२९-पिंपळढव -सर्वसाधारण.पुर्वी पाळज गट ना.मा.प्र.प्रवर्गासाठीच होता व पिंपळढव गट सर्वसाधारण करिताच होता.परंतू भोसी गट अनुसूचित जाती करिता सोडण्यात आला होता त्यात बदल होऊन तो आता अनुसूचित जमाती स्री राखीव झाला आहे.त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांची अपेक्षा भंग झाली व या गटातील मोठं राजकीय व्यक्तीमत म्हणून ख्याती असलेल्या माजी जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती प्रकाश देशमुख भोसीकर यांना ही नाईलाजास्तव हक्काच्या मतदार संघाबाहेर पडावे लागले आहे.
महायुती फिस्कटली ? तर पिंपळढव गटात दोन माजी जि.प.सभापतींमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता..!

माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर व माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर हे दोघेही एकेकाळीचे राष्ट्रीय काँग्रेसचे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे सोबती.खासदार अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसचा हात सोडून भाजपाची साथ धरली.यावेळी प्रथमतः बाळासाहेब पाटील रावणगावकर व प्रकाश देशमुख भोसीकर हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातच राहिले.यामुळे खा.अशोक चव्हाण व उपरोक्त दोघांत राजकीय मतभेद निर्माण झाले.परंतू विधानसभा निवडणुक-२०२४ पुर्वी प्रकाश देशमुख भोसीकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचा हात सोडला व खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.तर बाळासाहेब पाटील रावणगावकर हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातच राहिले.परंतू विधानसभा निवडणुकीनंतर पक्षिय कार्यकर्त्यांतर्गत मतभेद झाले व बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार)मध्ये प्रवेश केला.सद्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर महायुती संदर्भात काही निर्णय घेता येऊ शकतील असे संकेत देण्यात आले आहेत.त्यामुळे महायुती फिस्कटली व युतीधर्म पाळण्याची गरज नसेल तर बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत २९-पिंपळढव हा गट निवडणूक लढविण्यासाठी हक्काचा मतदार संघ राहणार आहे.कारण याच मतदार संघातील ते विद्यमान (माजी) सदस्य आहेत.त्यामुळे पक्ष देखील त्यांचाच उमेदवारी निश्चित देईल असे चित्र आहे.तर माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर यांना खा.अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असतांना आश्वासन देऊनही उमेदवारी दिली नव्हती.त्यामुळे ते सदस्य पदापासून वंचित राहिले होते.असे असतांनाही त्यांनी खा.अशोकराव चव्हाण, त्याच्या कन्या आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण व भाजपाचे चे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून भाजपा पक्षात प्रवेश केला.यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते उमेदवारी चे हक्कदार आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठी व खा.अशोक चव्हाण हे त्यांच्या पक्षनिष्ठेचा आणि परिश्रमाचा विचार करून यावेळी त्यांना २९ पिंपळढव गटातून उमेदवारी देतील अशी अपेक्षा त्यांच्या सहर्थकांतून व्यक्त केली जात आहे.जर असे झाले तर पिंपळढव गटात या दोन माजी सभापतींमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.
किशोर पाटील लगळूदकर यांची ही उमेदवारीसाठी दावेदारी…
माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांचे खंदे समर्थक असलेले किशोर पाटील लगळूदकर यांनी डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांच्या समवेत भाजपात प्रवेश केला होता.पक्षश्रेष्ठीने त्यांचे कार्यकर्तुत्व व पक्षनिष्ठा पाहून तालुकाध्यक्ष ते जिल्हाउपाध्यक्ष ही पदे बहाल केली. डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपा सोडली, परंतू किशोर पाटील लगळूदकर यांनी मात्र भाजपा सोडली नाही व आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले.ते भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जुन्या फळीतले ठरत आहेत.त्यामुळे उमेदवारी मागण्याचा पहिला हक्क त्यांचा आहे असे त्यांच्या समर्थकांतून बोलल्या जात आहे.याच पार्श्वभूमीवर त्यांनी देखील उमेदवारी करिता दावेदारी दर्शविली आहे.तर मग पाहुयात भाजपा या दोघांपैकी कोणास उमेदवारी देईल ते ?




