हस्सापूर येथील मातंग समाजातील एका जेष्ठ नागरिकाच्या अंत्यविधीस जागा देण्यास झाला होता विरोध
{गावातील सुज्ञ नागरिक,महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने व संपादक उत्तम बाबळे यांच्या पुढाकारातून त्यांच्या अंत्यविधीसह कायमस्वरूपी हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न ही लागला मार्गी...}

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मौ.हस्सापूर ता.भोकर येथील मातंग समाजातील ज्येष्ठ नागरिक किसनराव सटवाजी दिवटे (७५) यांच्या अंत्यविधीसाठी जागा देण्यासाठी एका शेतकऱ्याने तीव्र विरोध केला.यामुळे सवर्ण व दलित यांच्यात मोठा वाद निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.यावेळी संभाव्य वाद होऊ नये म्हणून गावातील काही सुज्ञ नागरिक, महसूल प्रशासनाची मध्यस्थी व डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांच्या पुढाकारातून हा प्रश्न सामंजस्य आणि समन्वयातून सोडविण्यात आला.यामुळे त्यांच्या अंत्यविधीसह गावासाठी अत्यावश्यक असलेल्या कायमस्वरूपी हिंदू स्मशानभूमीचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी तातडीने पुढाकार घेत महसूल प्रशासनाशी समन्वय साधला.त्यांच्या प्रयत्नांना गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,पोलीस पाटील तसेच महसूल विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संभाव्य वाद टळला आहे…
सदरील घटनेच्या बातमीचा व्हिडिओ या युट्यूब लिंकवर पहावा
मातंग समाजातील जेष्ठ नागरिक किसनराव सटवाजी दिवटे (माळकरी) यांचे दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे १:०० वाजता वृद्धापकाळी उपचारादरम्यान नांदेड येथे निधन झाले.गावी मौ.हस्सापूर येथे दुपारी १:०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले.परंतू मौ.हस्सापूर येथे हिंदू स्मशानभूमी उपलब्ध नाही व पूर्वी ज्या ठिकाणी अंत्यविधी केल्या जात होता त्याठिकाणी अंत्यविधी करु देण्यास एका शेतकऱ्याने तीव्र विरोध दर्शविला.त्यामुळे सवर्ण विरुद्ध दलित असा मोठा वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.ही माहिती डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांना गावातील काही सुज्ञ नागरिकांनी व मयत दिवटे यांच्या नातेवाईकांनी दिली.ही माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपादक उत्तम बाबळे यांनी तातडीने तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी एम.पी.मगरे व अन्य कर्मचाऱ्यांना तात्काळ हस्सापूर येथे पाठवून दिले.गावातील प्रतिष्ठित नागरिक उत्तमराव पाटील जाधव,अप्पाराव पाटील जाधव, दशरथ पाटील कदम,रावसाहेब पाटील जाधव,अशोकराव किनेवाड,मोहनराव कदम,दशरथ डांगे,तसेच तंटामुक्ती अध्यक्ष भुजंगराव डांगे,पोलीस पाटील सुनिलराव किनेवाड, सरपंच प्रतिनिधी हनुमंत तेलंगे,सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे,जाकापूरचे सरपंच सुनील जाधव,मयताचे नातेवाईक यांसह बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत संपादक उत्तम बाबळे यांच्या पुढाकारातून बैठक घेण्यात आली.
या बैठकीत संपादक उत्तम बाबळे यांनी गावठाण किंवा कोणी दान दिलेली जमिन उपलब्ध आहे काय? असे विचारले असता सर्वे नंबर ५१/५२ मध्ये एका संताने दान दिलेली जमीन उपलब्ध असल्याचे समोर आले.त्या जमिनीतील काही जागा हिंदू स्मशानभूमीसाठी घेता येऊ शकते असे सर्वानुमते ठरले.याविषयीची माहिती तहसिलदार विनोद गुंडमवार यांना देण्यात आली असता त्यांनी मंडळ अधिकारी यांना सुचविले की,सर्व संमतीने होत असेल तर आपण ही रितसर ती जागा हिंदू स्मशानभूमीसाठी देण्याचा प्रयत्न करु,तसेच त्या जागेत स्व.किसनराव दिवटे यांचा अंत्यविधी करावा.या मानवातावादी निर्णयामुळे स्व.किसनराव दिवटे यांचा अंत्यविधी त्या नुतन जागेत बहुसंख्य नातेवाईक,गावकरी, महसूल प्रशासन प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत शांततेत झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन मुली,सून,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गावासाठी आदर्श घडवणारा ऐतिहासिक निर्णय…
गाव तिथे स्मशानभूमी उपलब्ध असलीच पाहिजे हा प्रत्येक नागरिकांसाठी लोकशाहीतील संविधानिक अधिकार आहे. नसेल तर ती उपलब्ध करून देण्याचा अधिकाररुपी प्रयत्न शासन व प्रशासनाकडून केला जातो.परंतू अद्यापही अनेक गावांत स्मशानभूमी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येते. हस्सापूर येथे ही स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.यावेळी डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी पुढाकार घेऊन महसूल प्रशासन प्रतिनिधी यांच्या मध्यस्थीने व गावातील सुज्ञ नागरिकांच्या सुसंवादातून समन्वय घडवून आणला.अशा वेळी सर्वांनी दाखविलेली वैचारिक परिपक्वता,समता,मानवता, सामाजिक संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली व संभाव्य वाद टळला असून गावातील सलोखा जपण्याचा आणि कायमस्वरूपी हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. गावासाठी आदर्श घडविणारा हा सर्वानुमते ऐतिहासिक निर्णय झाल्याने संपादक उत्तम बाबळे यांनी या प्रकरणी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.




