सुदृढ स्त्री ही कुटूंबाचा सक्षम आधार असते म्हणून तिच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे-आ.श्रीजया चव्हाण
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे जीवन ज्योत सामाजिक संस्था व गंगा हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या महिला आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आई,पत्नी,मुलगी,सून,सासू अशा विविध भुमिकेतून स्त्री ही संसाराचा रथ हाकत असते.यात ती जर आजारी पडली तर कुटूंबाचा हा रथ कोलमडतो.ती निरोगी राहिली तर कुटूंब ही निरोगीच राहते.सदृढ स्त्री ही कुटूंबाचा सक्षम आधार असते म्हणून तिच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते,असे प्रतिपादन आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.त्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे दि.२६ ऑक्टोबर रोजी जीवन ज्योत सामाजिक संस्था व गंगा हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या महिला आरोग्य शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचा वाढदिवस दि.२८ ऑक्टोबर रोजी आहे.या औचित्याने त्यांनी हा वाढदिवस हार,तुरे,भेटवस्तू न आणता लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन केले होते.याच अनुषंगाने डॉ.राम नाईक जाधव यांच्या जीवन ज्योत सामाजिक संस्था व गंगा हॉस्पिटल नांदेड च्या संयुक्त विद्यमाने दि.२६ ऑक्टोबर २०२५ रोजी जीवन ज्योत हॉस्पिटल किनवट रोड,भोकर येथे सकाळी ११:०० वाजता ‘महिला आरोग्य शिबिर व औषधी वाटप’ या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ चे थेट प्रक्षेपण पाहण्यात आले व तद्नंतर डॉ.राम नाईक जाधव व जाधव बंधूंनी सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.सदररील उपक्रम राबविण्याची पार्श्वभूमी डॉ. अनिता राम नाईक यांनी प्रास्ताविकातून विषद केली.तर उद्घाटक म्हणून बोलतांना आ.ॲड.श्रीजया चव्हाण या पुढे म्हणाल्या की,रासायनिक खताचा वापर सातत्याने होत असल्याने फळे,भाजीपाला,अन्नधान्य व खाद्यपदार्थातून ते विषयुक्त रसायण शरीरात जात आहे.त्यामुळे मानवी शरिरास अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.अशा परिस्थितीत महिला या त्यांना होणारे आजार लपवितात व कुटूंबातील लोकांना सांगत नाहीत.चुकीच्या जीवनशैलीने आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कुटूंबातील प्रत्येकाने खरा आधारस्तंभ असणाऱ्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.याच उदात्त हेतूने सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याने मी आयोजकांचे कौतुक करते,असे त्या म्हणाल्या.उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या महिला आरोग्य शिबिरात महिला रुग्णांची तपासणी स्त्री रोग तज्ञ डॉ.मनिषा मुंडे,डॉ.मनिषा भाले,डॉ.कनिज फातेमा ईनामदार,डॉ.अनिता नाईक जाधव, डॉ.अशोक मुंडे,डॉ.गजानन आलपेवाड,नामदेव चौरे,डॉ.राम नाईक जाधव यांसह आदी तज्ज्ञ डाॅक्टरांनी केली.तर सदरील उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन साहित्यिक चंदू चक्रवार यांनी केले.




